कृषीसामाजिक

सोयाबीन – कापूस आंदोलन चिघळणार ? रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठींबा राज्यभरातील शेतकऱ्यांचे ठिक- ठिकाणी आंदोलने !

ब्युरो रिपोर्ट बुलढाणा :- सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सरकारचा दबाव झुगारून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज २६ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी चिखली तालुक्यातील सोमठाणा या आंदोलन स्थळी पोहोचत आहेत. दुसरीकडे राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २९ नोव्हेंबर रोजी मिळेल त्या मार्गाने मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

येलो मोझेंक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रु. भाव मिळावा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० टक्के पिकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार व २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. त्यानंतर काल २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी प्रचंड फौज फाट्यासह अचानक तुपकर यांच्या घरी धडक देत त्यांना बळजबरीने अटक केली. पोलिसांच्या या अन्यायकारक कारवाईमुळे राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राज्यभरात आंदोलनांचा धडाका सुरू झाला. दरम्यान रविकांत तुपकरांना सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची मुक्तता केली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकारांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू देखील केले. जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहे. पोलिसांनी केलेली चुकीची कारवाई आणि सरकारकडून आंदोलन दडपण्याचा होणारा प्रयत्न हे पाहता कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलनाची ज्योत पेटली असून कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावना पाहता आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. चोर लुटारू आणि दोन नंबरचे धंदे करणारे गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहेत, असे लोक खुलेआम फिरत आहेत. परंतु पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही तर दुसरीकडे सोयाबीन-कापसाला भाव मागणाऱ्यांवर कारवाई केली जाते हा कुठला न्याय? शेतकरी आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव आहे. परंतु आता शेतकऱ्यांची फौज मागे वळणार नाही.

शहीद झालो तशेतकऱ्यांसाठीरी चालेल परंतु आता मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेणारच असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तुपकर यांच्या आवाहनानुसार गावा-गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज होत आहेत. तसेच राज्यभरातील कार्यकर्ते देखील रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहता हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबरला शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतीलच – रविकांत तुपकर

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्या सरकारने २८ नोव्हेंबर पर्यंत मान्य केल्या नाही तर २९ नोव्हेंबर हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. यावर शेतकरी ठाम असून २८ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना होतील व २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेतील, असे रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close