
भाजपाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी शेतकऱ्याला सोडले वाऱ्यावर,शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत अद्याप नाही
प्रतिनिधी : (सचिन उबाळे उमरखेड – महागाव)
विद्यमान आमदार फोटोसेशन मध्ये व्यस्त असल्याची जोरदार चर्चा
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे जगणे हे संकटांचे दुसरे नाव झाले आहे. पाऊस आला तरी संकट, नाही आला तरी संकट. पण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने या भागातील हजारो शेतकऱ्यांना जमीनदोस्त केले. शेतात पेरलेलं स्वप्न वाहून गेलं आणि उरलं ते फक्त कर्ज, चिंता आणि डोळ्यात पाणी
या संकटसमयी लोकप्रतिनिधीने पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, प्रशासनावर दबाव टाकावा, केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशीच अपेक्षा असते. मात्र दुर्दैवाने उमरखेड-महागावचे विद्यमान आमदार किसनराव वानखेडे हे या बाबतीत पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहेत.
हे कोणते लोकप्रतिनिधी? संकटात असलेल्या जनतेला दिलासा देणं, त्यांच्या मागण्या शासनदरबारी पोचवणं, आणि वेळीच निधी मिळवणं हीच तर आमदारांची जबाबदारी असते. मात्र वानखेडे यांच्या भूमिकेवरून असं स्पष्ट होतं की, त्यांनी ही जबाबदारी झटकून टाकली आहे.
मदत फक्त घोषणांमध्ये, खात्यात शून्य रुपये
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महागाव, उमरखेड आणि परिसरात प्रचंड हानी झाली होती. शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. मात्र आज एक वर्ष लोटून गेलं तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाचीही मदत जमा झालेली नाही.
शासनाच्या तिजोरीत पैसे नाहीत का? की मधल्या यंत्रणांनी गोंधळ घातला आहे? या सगळ्याचा शोध लावणं आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे काम आमदारांचं असतं. पण इथे तर आमदारच गायब झाले आहेत!
आमदार सक्रिय केव्हा? – फक्त फोटोसेशनसाठी
गावात एखादा उद्घाटन सोहळा असो, मंदिरातील पूजन असो, वा राजकीय बॅनर उघडण्याचा कार्यक्रम असो – आमदार साहेब त्यात अगदी पहिल्या रांगेत दिसतात. एकदम हसतमुख, फोटोसाठी पोझ देणारे. सोशल मीडियावर त्यांचे दर आठवड्याला फोटो झळकतात, पण शेतकऱ्याच्या बांधावर ते कधी पोचले आहेत का?
जिथे गरज आहे, तिथे आमदार नाही. आणि जिथे प्रसिद्धी आहे, तिथे आमदार हजर!
ही जनतेची भावना आहे आणि ही भावना दिवसेंदिवस प्रचंड रोषात बदलत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक वेळा शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वाधिक असते. अशा परिस्थितीत जेव्हा लोकप्रतिनिधी बेजबाबदार वर्तन करतो, तेव्हा परिस्थिती आणखीनच गंभीर बनते.
निष्क्रियतेचा हा खेळ किती काळ?
लोकशाहीत प्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मात्र इथे ‘मी काही करू शकत नाही’ हे सांगणारा आमदार बसवलाय. हा निष्क्रियतेचा खेळ आणखी किती काळ सुरू राहणार? आणि जनता किती काळ सहन करणार?
या सगळ्या परिस्थितीमुळे उमरखेड-महागाव मतदारसंघात असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः युवक आणि शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर देखील या निष्क्रियतेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एक साधा प्रश्न – लोकप्रतिनिधी जर काम करणार नाही, तर मग का निवडावा?
“आम्ही निवडून दिला सेवक म्हणून, पण आम्हाला मिळालाय फोटोसेशनचा आमदार! विकासाच्या योजना, मदतीचे पाठपुरावे, जनतेच्या समस्या – यापैकी कोणत्याही मुद्द्यावर आमदारांची तत्परता दिसत नसल्याची चर्चा जनतेमध्ये रंगत आहे ”
आज जनता पाहते आहे. जनतेला सगळं समजतंय. आणि योग्य वेळी ती उत्तर देईल. कारण लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वोच्च सत्ता असते. जो जबाबदारी स्वीकारत नाही, त्याला पुन्हा सत्ता देण्यातही जनता रस दाखवत नाही.