धाडसी वनपाल विजय सिंगनजुडे यांचे उपचारादरम्यान निधन

धाडसी वनपाल विजय सिंगनजुडे यांचे उपचारादरम्यान निधन
यवतमाळ ब्युरो रिपोर्ट :
हिवरी – मनपुर जंगलातील भीषण आग विझवताना गंभीररीत्या भाजलेल्या धाडसी वनपाल विजय रामदास सिंगनजुडे (रा.पुसद) यांचे आज शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वन विभागासह पुसद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय सिंगनजुडे हे यवतमाळ जिल्ह्यातील हीवरी-मनपूर बिट येथे वनपाल म्हणून कार्यरत होते. जंगलात लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वनसंपत्ती आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीशी झुंज दिली.
दरम्यान, आग अचानक चारही बाजूंनी भडकत गेल्याने ते वनव्यात अडकले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी झाडावर चढून आसरा घेतला; मात्र आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे परिस्थिती गंभीर बनली. झाडावरून खाली उडी घेऊन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ते गंभीररीत्या भाजले. या घटनेत ते सुमारे ६० टक्के भाजले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते; मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली.
त्यांच्या पश्चात ७५ वर्षीय आई सुमित्राबाई, पत्नी संध्याताई, मुलगा, मुलगी तसेच भाऊ अरुण, सुरेश व त्यांचा परिवार असा मोठा आप्तपरिवार आहे.
वनसंपत्ती आणि वन्यजीवांचे रक्षण करताना कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणाऱ्या या धाडसी वनपालाच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.



