शेलोडी येथे कृषि कन्यांकडून युरिया उपचारित चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक

शेलोडी येथे कृषि कन्यांकडून युरिया उपचारित चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक
ब्युरो रिपोर्ट दारव्हा :
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा संचलित कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत शेलोडी येथे कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना युरिया उपचारित चारा निर्मितीबाबत मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
कृषिकन्या शितल शिंदे, साक्षी धांदे, ममता जुमनाके, श्रद्धा लामसोगे आणि वैष्णवी महाले यांनी शेतकऱ्यांना वाळवलेल्या सोयाबीन कुटारावर युरिया उपचार करण्याची वैज्ञानिक पद्धत समजावून सांगितली. यावेळी ४० लिटर पाण्यात २ किलो युरिया मिसळून त्याचे द्रावण तयार करण्यात आले. हे द्रावण १०० किलो वाळवलेल्या सोयाबीन कुटारावर शिंपडून मिश्रण एकजीव करण्यात आले आणि त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
मार्गदर्शनादरम्यान कृषिकन्यांनी सांगितले की, युरिया उपचारामुळे सोयाबीन कुटारातील लिग्निनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व प्रोटीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरांची पचनक्षमता सुधारते, पोषकद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते तसेच चाऱ्याची पौष्टिकता वाढते. या प्रक्रियेमुळे चाऱ्यातील प्रोटीनचे प्रमाण साधारणतः दोन ते तीन टक्क्यांनी वाढून जनावरांच्या वाढीला, आरोग्याला आणि प्रजननक्षमतेला चालना मिळते.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमास गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. खाडे, विषय विशेषज्ञ प्रा. मस्के तसेच कार्यक्रम प्रभारी प्रा. देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कमी खर्चात जनावरांसाठी दर्जेदार व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे प्रात्यक्षिक उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.



