सिझा फातेमा या चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाचा आरोप; वडिलांनी केली निष्पक्ष चौकशीची मागणी
पुसद शहर पोलीस ठाण्यात डॉक्टराविरुद्ध तक्रार

सिझा फातेमा या चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ,
डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाचा आरोप; वडिलांची निष्पक्ष चौकशीची मागणी
२१ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता उपचारासाठी दाखल; २२ सप्टेंबरला रात्री दोन वाजता मृत्यू !
महागाव ब्युरो रिपोर्ट :
उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या अवघ्या एक वर्षाच्या सिझा फातेमा सय्यद मुदस्सीर या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिचे वडील सय्यद मुदस्सीर सय्यद जमील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात डॉ. कदम हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करून निष्पक्ष चौकशी व दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता सिझा फातेमा हिला उपचार व तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर रात्री तिला डॉ. कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीची प्रकृती गंभीर होत असतानाही वेळीच आवश्यक व योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
♦️रात्री दोन वाजता चिमुकलीचा मृत्यू♦️
उपचारादरम्यान २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता सिझा फातेमा हिचा मृत्यू झाला, अशी तक्रारीत नोंद आहे. सकाळी साडेअकरा वाजता उपचारासाठी रुग्णालयात नेलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा काही तासांतच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
माझ्या मुलीला न्याय मिळावा उपचारात हलगर्जीपणा झाला का, योग्यवेळी योग्य उपचार करण्यात आले का, डॉक्टरांची उपस्थिती व वैद्यकीय उपचारपद्धती नियमानुसार होती का, याची निष्पक्ष वैद्यकीय व पोलिस चौकशी करण्यात यावी. दोष आढळल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आपल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सय्यद मुदस्सीर यांनी पुसद शहर पोलिसांकडे केली आहे.
………………………..
डॉक्टर भानूप्रकाश कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; अन्यथा उपोषणाचा इशारा!
सिझा फातेमा प्रकरणी तिचे वडील सय्यद मुदस्सीर यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर भानूप्रकाश कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी लेखी तक्रार दिली आहे.
या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी व तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुसद शहर पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास न्यायाच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा सय्यद मुदस्सीर यांनी दिला आहे.



