क्राइम

निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे यांच्या तक्रारीवरून मलकापूर येथील रास्तभाव धान्य दुकानाविरोधात गुन्हा दाखल

मलकापूर येथील रास्तभाव धान्य दुकानातील गैरव्यवहार उघड; निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

महागाव प्रतिनिधी :

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मलकापूर येथील संत ज्ञानेश्वर अपंग बचत गट संचलित रास्तभाव धान्य दुकानातील कथित गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षण अधिकारी मोहन महादेव कोल्हे यांनी महागाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रास्तभाव धान्य दुकानाचे अध्यक्ष सुधाकर नागो भोयर यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 मधील तरतुदींनुसार फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीनुसार, मलकापूर येथील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी दुकानातून नियमित धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी तहसील प्रशासनाकडे केल्या होत्या. दुकान वारंवार बंद असणे, धान्य उपलब्ध नसल्याचे सांगणे, वजनात कमी धान्य देणे तसेच लाभार्थ्यांशी अयोग्य वर्तन केल्याचेही तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने संबंधित दुकानाची आकस्मिक तपासणी केली.

तपासणीदरम्यान अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुकानात दर्शनी समितीचा फलक नसणे, धान्याचे नमुने नियमाप्रमाणे ठेवलेले नसणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध नसणे, भेट व तक्रार पुस्तिका न ठेवणे, वजन-मापाचे प्रमाणीकरण न करणे तसेच आवश्यक नोंदवह्या व विक्री रजिस्टर सादर न करणे अशा विविध त्रुटी आढळल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

याशिवाय, ऑनलाइन साठा व प्रत्यक्ष साठ्यामध्ये मोठी तफावत आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंचनामा आणि तपासणीत गहू 38.68 क्विंटल, तांदूळ 26.70 क्विंटल आणि साखर 1.98 क्विंटल इतका तुटवडा आढळून आला. या धान्याची किमान आधारभूत किमतीनुसार अंदाजे 1 लाख 71 हजार 835 रुपये इतकी किंमत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीत असेही नमूद करण्यात आले आहे की, 98 लाभार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून अनेकांनी नियमानुसार धान्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच काही लाभार्थ्यांनी दुकानात महिलांशी अयोग्य भाषा वापरणे, वारंवार शिवीगाळ करणे आणि धान्य वितरणात मनमानी केल्याचे आरोप आपल्या जबाबात केले आहेत.

या सर्व बाबींच्या आधारे रास्तभाव धान्य दुकानाचे अध्यक्ष सुधाकर नागो भोयर यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरण (विनियमन) अधिनियमातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई तहसीलदार अभय म्हस्के यांच्या मार्गदर्शनात पार पाडली असून

या कारवाईमुळे मलकापूर परिसरातील शिधापत्रिकाधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दोषींवर कठोर कारवाई करून लाभार्थ्यांना नियमित व पारदर्शक धान्य वितरण सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close