आरोग्य

सिझा फातेमा सय्यद या चिमुकलीचा निमोनियाने दुर्दैवी मृत्यू! डोंगरगावच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

निमोनियाने एक वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू! डोंगरगावच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

यवतमाळ दि. 22 / 09/2026

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे निमोनियामुळे अवघ्या एक वर्षाच्या सिझा फातेमा सय्यद या चिमुकलीचा २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांच्या या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, डोंगरगावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

पण या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचे दुःख समोर आणले नाही, तर डोंगरगावच्या आरोग्य व्यवस्थेची पोलखोल करणारे अनेक गंभीर प्रश्न ऐरणीवर आणले आहेत!

 

गावात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे नागरिक आधीपासूनच चिंतेत आहेत. मग प्रश्न असा आहे—प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना नेमक्या कुठे आहेत?

 

डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना नियमित फॉगिंग कुठे आहे? औषध फवारणी कुठे आहे? साचलेल्या पाण्याचा निचरा आणि प्रभावी स्वच्छता मोहीम कुठे आहे?

 

आजारांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत होणे अपेक्षित असताना डोंगरगावकडे आरोग्य विभागाचे पुरेसे लक्ष आहे का? हा सवाल आता ग्रामस्थ थेट विचारत आहेत.

 

महागाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगरगावला अद्याप स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र नाही! प्राथमिक उपचार आणि तपासणीसाठी नागरिकांना इतर ठिकाणी धाव घ्यावी लागते. मग ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची?

 

या पार्श्वभूमीवर डोंगरगावला तातडीने आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

आपल्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांची योग्य ती चौकशी करावी आणि ग्रामीण भागात प्रभावी प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

 

डोंगरगावमध्ये तातडीने फॉगिंग, औषध फवारणी, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्याबरोबरच कायमस्वरूपी आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

 

चिमुकली सिझा फातेमा सय्यदच्या मृत्यूने आता अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत!

 

डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव आणि आरोग्य सुविधांची कमतरता—या सगळ्या प्रश्नांकडे प्रशासन आता तरी गांभीर्याने पाहणार का?

 

एका चिमुकलीचा मृत्यू दुःखद आहे; पण अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासन आता जागे होणार का?

 

डोंगरगावला आरोग्य उपकेंद्र कधी?

फॉगिंग आणि फवारणी कधी?

आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close