सामाजिक

ढाणकीत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

ढाणकीत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

आनंदराव पतंगे (​ढाणकी प्रतिनिधी )

ढाणकी येथील सराफा लाईन परिसरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समस्त सराफा सुवर्णकार समाज, ढाणकी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

​भक्तीमय वातावरणात निघाली ग्रामप्रदक्षिणा

​कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात झाली. यावेळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची आणि पालखीची गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. ‘विठ्ठल-विठ्ठल’ आणि ‘संत नरहरी महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. गावातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या प्रदक्षिणेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाने रंगला सोहळा

​पुण्यतिथी निमित्त आयोजित ‘भव्य कीर्तन सोहळ्या’त आळंदी येथील ह.भ.प.अर्पिताताई मिराशे अकोलीकर या बाल कीर्तनकाराचे कीर्तन संपन्न झाले. आपल्या रसाळ वाणीने त्यांनी संत नरहरी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगांचे सुंदर वर्णन करत उपस्थितांना भक्तीरसात चिंब केले.

​महाप्रसादाचे आयोजन

​कीर्तनानंतर दुपारी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ढाणकी शहर व परिसरातील भाविक आणि सर्वधर्मीय नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. “ज्यांनी आपल्या कलेतून आणि भक्तीतून पांडुरंगाला साद घातली, अशा थोर संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त सराफा सुवर्णकार समाजातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close