ढाणकी शहरातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करा ! – दर्पण पत्रकार संघाची मागणी.

ढाणकी शहरातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करा ! – दर्पण पत्रकार संघाची मागणी.
ढाणकी प्रतिनिधी ( आनंदराव पतंगे ) : –
ढाणकी शहरातील जुने बस स्टॉप येथे वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध जुगार, ऑनलाईन जुगार, त्याबरोबरच मटका शहरामध्ये चौका चौकात खुलेआम सुरू असून, अवैध गुटखा विक्री सुद्धा जोरात सुरू आहे.
याबरोबरचं अवैध देशी दारू वाहतूक,अवैध गोळीमिश्रीत सिंधी विक्री ने शहरात थैमान घातले आहे.
सदर अवैध धंद्यांना कायद्याने बंदी असून, ढाणकी शहराला हा कायदा लागू होत नाही का ? हा प्रश्न शहरात सुरू असलेल्या खुलेआम अवैध धंद्यांवरून निर्माण होत आहे.
सदर अवैध धंद्यामुळे कित्येकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. कायद्याच्या रक्षकांचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असुन अवैध धंदेवाले आता कायदा हातात घेण्याची भाषा करून, जनसामान्यांना नाहक त्रास देत असल्याचं चित्र शहरात दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. संबंधित पोलीस प्रशासन हे वरील गंभीर बाबींवर अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे शहरात सुरू असलेल्या खुलेआम अवैध धंद्यावरून निदर्शनास येत आहे.
सदर अवैध धंदे त्वरित बंद करावे.
ढाणकी शहरातील सदर अवैध धंदे त्वरित बंद न झाल्यास, दर्पण पत्रकार संघ सदर अवैध धंद्यांविरोधात वरिष्ठ पातळीवर संवैधानिक मार्गाने मोठे जनआंदोलन उभे करणार.
त्यास सर्वस्वी जबाबदार स्थानिक पोलीस प्रशासन व संबंधीत विभाग असेल.
अशा आशयाचे निवेदन दर्पण पत्रकार संघाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री यवतमाळ ,जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ जिल्हा, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड व ठाणेदार बिटरगाव पोलीस स्टेशन यांना दिल्याची माहिती आहे.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
ढाणकी शहरात सुरू असलेले अवैध धंदे दिवसेंदिवस फोफावत असून, सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. यामुळे गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला निवेदनाद्वारे आम्ही विनंती केली असून, यावर त्वरित दखल न घेतल्यास मोठे जन आंदोलन उभारणार. यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना सर्वस्वी संबंधित प्रशासन व पोलीस प्रशासन हे जबाबदार राहील.
संजय सलेवाड
अध्यक्ष दर्पण पत्रकार संघ, ढाणकी.



